धान्याचा काळाबाजार करणारा ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अन्न धान्याचा काळाबाजार वाढला आहे. गरिबांना मंजूर असलेले धान्य विक्रीस उपलब्ध नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांकडून धान्य परस्पर विकले जात असल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. यांना आळा बसावा यासाठी पोलीस पथके देखील सक्रिय आहे.

नुकतेच शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे एक ट्रक शासकीय धान्य काळ्या बाजारात विक्रीला जात असताना सोमवारी दुपारी पकडले आहे.

ग्रामस्थांच्या सतर्कतेने हे धान्य पकडले गेले. प्रभारी पुरवठा निरीक्षक यांनी याचा पंचनामा केला आहे. ६० गोण्या तांदूळ व १०० गोण्या गहू असे ८० क्विंटल शासकीय धान्य जप्त करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळ टेम्पोमधून काळ्या बाजारात विक्रीला चालला होता.

अमरापूरजवळील पाण्याच्या टाकीपुढे रस्त्यावर हा टेम्पो उभा होता. त्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयास माहिती दिली. त्यानंतर नायब तहसीलदार व्ही.के. जोशी व प्रभारी पुरवठा निरीक्षक एस. एम. चिंतामणी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी या धान्याचा पंचनामा केला. हे धान्य शेवगाव शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे केसभट वस्तीतील असणाऱ्या खासगी पटांगणातून भरण्यात आले.

कुठे खाली करायचे हे अमरापूर येथे सांगण्यात येईल, अशी सूचना दिल्याचा जबाब ट्रकचालक प्रल्हाद दिनकर पवार (रा. नवगन राजुरी, ता. जि. बीड) याने दिला आहे. या ट्रक चालकाकडे कुठलेही परमिट व वाहतूक मार्ग नव्हता. हा ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला असून उशिरापर्यंत कारवाई चालू होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24