अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळगाव या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून देशी- विदेशी दारूचा साठा पकडला. दारू विक्रीचा परवाना नसताना तब्बल 96 हजार रूपये किंमतीचा दारूसाठा यावेळी जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर- दौंड रोडवरील कोळगाव शिवारात कावेरी हॉटेलच्या पाठीमागे दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.
पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता दारू साठा मिळून आला. दारू विक्री करणार्या रोहिणी सतिष घोडंगे (रा. कोळगाव ता. श्रीगोंदा) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.