अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सोनई आणि शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या गावठी कट्ट्यांचा वापर होऊन दहशतीचे वातावरण करत खून, गोळीबार व प्राणघातक हल्ले होत असल्याने सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरली आहे.
पोलीस यंत्रणेचा या वाढत्या दादागिरीवर अजिबातच धाक राहिला नसल्याने काळ सोकावत चालल्याचा उघड आरोप आता होऊ लागला आहे.चांदा खूनप्रकरण ताजे असतानाच दुसरा गुन्हा बऱ्हानपूर येथे घडला.
दोन आरोपींनी गावठी कट्ट्यातून ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. १० दिवसांत दोन प्रकरणे होऊनही सोनई व शनिशिंगणापूर पोलीस ठाणे सुस्त आहेत.
अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ तर मिळत नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. सर्वच अवैद्य धंद्यावाल्याकडे गावठी कट्टे असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असताना येथे मात्र राजरोस अवैध धंदे सुरु सुरू आहेत. पोलीस याकडे अर्थपूर्ण दृर्लक्ष करीत आहेत.
पांढरीपुल एमआयडीसी, घोडेगाव परिसरात गावठी कट्टे दाखवून गाड्या लुटीचे प्रकार, डिझेल-पेट्रोल चोरी, अवैध धंदे व रस्तालूट वाढण्यास पोलिसांचे दुर्लक्षच कारणीभूत आहे.
सोनई- शिंगणापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैद्य धंद्यांना खतपाणी घालण्याचे काम काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. कोरोनाची दुसरी लाट संपत नाही, तोच अवैध धंदे सुरू झाले आहेत.
सोनई परिसरात झालेल्या मोबाईल चोरी, मोटरसायकल चोरीचा अजून तपास लागलेला नाही. सोनईतील युवकांनी एकत्र येऊन संशयितांना पकडले.
त्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ही टोळी अनेक दिवसांपासून सक्रीय होती. हे परप्रांतीय गुन्हेगार चोरीच्या डिझेलची कोणामार्फत विक्री करत होते, याचीही चौकशी करण्याची गरज आहे.