अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने नगर तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरू असणाऱ्या गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली.
याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दारू भट्ट्या उदध्वस्त करत लाखो रुपयांची दारू नष्ट केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील खडकी शिवारात सुमन संजय पवार ही विनापरवाना तयार गावठी दारू विकताना पोलिसांना आढळून आली. २ हजार रुपये किमतीची २० लीटर गावठी दारू पोलिसांनी नष्ट केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमगाव वाघा येथील पवार वस्ती शिवारात असणारा गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. २४ हजार रुपये किमतीचे ४०० लीटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट करून सचिन नाथा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळकी येथील धोंडेवाडी शिवारात असणाऱ्या हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत तीन हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले. पोलिसांना पाहताच संतोष दिलीप पवार पळून गेला.
पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकत येथे सीना नदी परिसरात चार ठिकाणी चालू असलेल्या हातभट्ट्या उदध्वस्त करत दारू तयार करण्याचे १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले.
याप्रकरणी दत्तू महिपती पवार, सोमनाथ नारायण पवार, राजू मौला पवार, अर्जुन मौला पवार (सर्व रा. साकत, ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेप्ती येथील गावठी दारू अड्ड्यावर कारवाई करत २ हजारांची २० लीटर दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी सुभाष रघुनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे.