ताज्या बातम्या

Shambhuraj Desai : पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरे गटातील आमदारांशी बोलणी सुरु; शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

Published by
Ahmednagarlive24 Office

Shambhuraj Desai : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडताना दिसत आहेत. शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरे गटातील काही नेते संपर्कात असलायचा दावा केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आणखी फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार रात्री बेरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत असा खळबळजनक दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई यांनीही ठाकरे गटातील आमदारांविषयी खळबळजनक भाष्य केले आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटातील आमदारांशी बोलणी सुरु असल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.

शंभुराज देसाई म्हणाले की, ठाकरे गटातील आमदार आमचे मित्र आहेत. आमची त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. लवकरच काही आमदार शिंदे गटात येतील.

ठाकरे गटात आमदार नाराज आहेत, असे सांगतानाच शिल्लक सेनेत कोणी शिल्लक राहिलं असे वाटत नाही असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. यावरही शंभुराज देसाई यांनी टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते.

त्यावेळी त्यांच्या हातात सत्ता होती. उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या शब्दाला किंमत होती. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होते. तरीही ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, लोकांच्या दारात गेले पाहिजे हे आम्ही त्यांना सांगत होतो. आम्ही तर जातच होतो. पण तुम्हीही जावे, असे आम्ही सांगत होतो. पण त्यांना मातोश्री आणि वर्षा सोडवत नव्हते. आता सत्ता गेल्यावर उसणे आवसान आणले जात आहे, असेही देसाई म्हणाले.

शंभुराज देसाई यांनी ठाकरे सरकारच्या काळात कशी मदत केली आणि शिंदे सरकारच्या काळात कशी मदत केली जात आहे यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, तुमच्या काळात अतिवृष्टी झाली. तेव्हा तुम्ही एनडीआरएफच्या निकषाने मदत केली.

आम्ही एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक मदत केली. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तरीही आम्ही मदत केली. तुम्ही उसणे आवसान आणून शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहात. ते शेतकरी पाहत आहेत असेही शंभुराज देसाई म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office