अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठे इन्कमिंग झाले आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या शहर अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद,
भिंगार भारिप बहुजन महासंघाचे माजी शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, पद्मशाली समाजाचे नेते नारायण कोडम, समाजवादी पार्टीचे माजी शहर मुख्य संघटक हनिफ मोहम्मद शेख आदी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
किरण काळे यांच्यावर ना.बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविल्या नंतरचा नगर शहर जिल्हा काँग्रेसमधील मुंबईत पार पडलेला हा पहिलाच व भव्य प्रवेश सोहळा आहे. नगर शहरातून यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे नगर शहरात काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळाले असून राजकीय धुरिणांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. यावेळी ना. थोरात, आ.पटोले यांनी विविध पक्षातून नगर शहरामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांना काँग्रेसचा पंचा घालत त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी “ना. बाळासाहेब थोरात, किरणभाऊ काळे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !” या घोषणांनी काँग्रेस प्रदेश कार्यालय दणाणून गेले होते. प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.मोहन जोशी, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, प्रदेश सचिव देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक काँग्रेसचे नेते तथा प्रदेश महासचिव निजाम जहागीरदार, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.थोरात म्हणाले की, किरण काळे हा नगर शहराला मिळालेला एक सुसंस्कृत, विकासाची दृष्टी असणारा युवा चेहरा आहे. मी आणि काँग्रेस पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज नगर शहरातील विविध पक्षातील नेत्यांनी काँग्रेसमध्ये केलेल्या प्रवेशाबद्दल मी काळे आणि सर्व प्रवेश केलेल्या नेत्यांचे अभिनंदन करतो. प्रदेशाध्यक्ष आ.पटोले म्हणाले की, ना.थोरात हे आमचे राज्याचे नेते आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये जिल्हाध्यक्ष किरण काळे हे काँग्रेस बांधणीचे झंजावती काम करीत आहेत. प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून काळेंना सर्वतोपरी ताकद दिली जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात काँग्रेस आगामी सर्व निवडणुकांची जोरदार तयारी करेल असा मला विश्वास आहे. जुबेर सय्यद यांनी शहर भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. केंद्रीय जहाज मंत्री दिवंगत दिलीप गांधी यांचे ते कट्टर समर्थक होते. सन २०१८ च्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या वतीने उमेदवारी करत चांगली मते घेतली होती. मुकुंद नगरमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुकुंद नगर भागाने काँग्रेसला राष्ट्रवादी पेक्षा अधिक मते देत आघाडी दिली होती. भाजपला खिंडार पाडत अल्पसंख्यांक आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षालाच काँग्रेसमध्ये खेचून आणत किरण काळे यांनी मुकुंद नगर मधील काँग्रेसच्या आगामी मोर्चेबांधणीची जोरदार रणनीती यानिमित्ताने आखली आहे. यावेळी जुबेर सय्यद यांच्यासह नूर मोहम्मद सय्यद, अनिस सय्यद, अश्पाक सय्यद, अनस शेख, नदीम सय्यद, मोसिन सय्यद, नियाज सय्यद, साबिल सय्यद, असरर सय्यद, साहील सय्यद, अतिफ सय्यद आदींनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नगरमध्ये पद्मशाली समाजाच्या मतदारांची मोठी संख्या आहे. पद्मशाली समाजाचे नेते असणाऱ्या सावेडी उपनगर येथील श्रमिक नगरच्या नारायण कोडम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणत किरण काळे यांनी पद्मशाली वोट बँकेला आकर्षित करण्याचे काम केले आहे. कोडम यांचा पद्मशाली समाजामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. काळे यांनी त्यांना काँग्रेसमध्ये घेत बळ दिल्यामुळे पद्मशाली समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारिप बहुजन महासंघाचे माजी भिंगार शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार यांना काँग्रेसमध्ये खेचत भिंगारमध्ये देखील काँग्रेसच्या नवीन टीमच्या बांधणीचे संकेत काळेंनी दिले आहेत.
भिंगारमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चाबुकस्वार यांनी काम पाहिले आहे. समाजवादी पार्टीमध्ये मुख्य शहर संघटक म्हणून काम केलेल्या मात्र मागील काही वर्षांपासून राजकारणातून अलिप्त असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते शेख मोहम्मद हनीफ जहागीरदार यांनी देखील मुकुंदनगर भागातून सक्रिय राजकारणात पुन्हा कमबॅक करत किरण काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावरती घेतल्यामुळे मुकुंद नगरमध्ये काँग्रेसचे बळ वाढले आहे.
सावेडी-श्रमिकनगर, मुकुंदनगर, भिंगार अशा शहराच्या विविध भागातून काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या इन्कमिंगमुळे शहरातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, पद्मशाली समाज, दलित समाज अशा वेगवेगळ्या समाजघटकांची एकत्रित मोट बांधण्याचे काम काळे यांनी केल्यामुळे आणि त्याला ना.थोरात, आ.पटोले यांनी मुंबईतून बळ दिल्यामुळे नगर शहरातील अडीच वर्षांनंतर होणाऱ्या मनपा निवडणुकीचा आत्तापासूनच बिगुल वाजल्याची चर्चा या प्रवेश सोहळ्यामुळे शहरात सुरू झाली आहे.
प्रदेश काँग्रेसने तसेच काळे यांनी नगर शहरात काँग्रेस मनपा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे यापूर्वीच घोषणा केलेली असल्यामुळे या प्रवेशांना महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळामध्ये काँग्रेसची रणनीती काय असणार आहे हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.