अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यातील हिवरेबाजार हे कोरोनामुक्त झाले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त व्हावे यासाठी पोपटराव पवार पुढे सरसावले आहे.
राज्याच्या आदर्शगाव योजना संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी राज्यातील २८ हजार गावांत ही मोहीम राबविण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे.
ग्रामस्वच्छता अभियान आणि तंटामुक्त गाव योजनेची जशी चळवळ झाली, तशीच करोनामुक्त गाव योजना सुरू केल्यास या कामाला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या लाटेत सुरक्षित राहिलेल्या हिवरे बाजार गावात दुसऱ्या लाटेत पहिल्याच टप्प्यात करोनाने प्रवेश केला.
मात्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी एकत्र येत नियोजनबद्ध पध्दतीने काम सुरू केले. व गाव कोरोनामुक्त करून दाखवले. हिवरेबाजारच्या या यशाची मोठी चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी या गावाची यशोगाथा देशाला सांगितली.
त्यानुसार आता नगर जिल्ह्यात काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारनेही याची दखल घेतली. ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पवार यांच्याकडून याची माहिती घेतली.
त्यानंतर आता पवार यांनी हिवरे बाजारमध्ये ही मोहीम कशी राबविली, अन्य गावांत कशी राबविता येईल, याची स्पर्धा कशी घेता येईल, याचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना तो पाठविण्यात आला आहे.