अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-संगमनेर बसस्थानकाच्या आवारात आपल्याच कार्यकर्त्यांनी उभारलेले आपलेच ‘फ्लेक्स’ काढून ‘आदर्श’ निर्माण करणार्या महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाला कार्यकर्त्यांकडून पाठ दर्शवण्यात आली आहे.
महसूलमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्याने हे नियम पायदळी तुडवीत बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा पोस्टरबाजी केली आहे.
आता बसस्थानकाच्या परिसरातील ‘त्या’ फ्लेक्सवर संगमनेर नगर पालिका काय कारवाई करणार असा सवाल विचारला जात आहे.
शहराच्या वैभवात भर घालणार्या बसस्थानक परिसराची चर्चा संपूणर जिल्ह्यात होत असते. मात्र गेल्या काही काळापासून या देखण्या इमारतीच्या बाह्यबाजूला ‘फ्लेक्स संस्कृती’ उदयाला आली,
आणि बघता बघता त्याची संख्या इतकी वाढली की त्यात शहराच्या वैभवात भर घालणार्या या वास्तुचेच विद्रुपीकरण सुरु झाले.
बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात दररोज एकमेकांचे फ्लेक्स लावण्याची आणि फ्लेक्सवरच आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याची एकप्रकारची स्पर्धात येथे बघायला मिळत होती.
यासर्व गोष्टींमुळे बसस्थानकाच्या व्यापारी संकुलात लाखों रुपये मोजून गाळे घेणार्यांची दुकानेही झाकली जावू लागल्याने त्यांच्याकडूनही नाराजीचा सुर निघतच होता.
मात्र फ्लेक्स लावणारे नामदार बाळासाहेब थोरात यांचेच कार्यकर्ते असल्याने यांना आवर घालणार कोण? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
दरम्यान नुकतेच संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शैलेश कलंत्री यांची वर्णी लागली,
आणि तब्बल तीन महिन्यांपूर्वी आपलाच फ्लेक्स हटवून आदर्श उभा करणार्या नामदार थोरात यांच्या संकेतांना त्यांच्याच एका पदाधिकार्यांच्या रुपाने पायदळी तुडविले गेले.