अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- शालेय शुल्क अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करता येणार नसल्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहे.
या अनुशंगाने शाळेची फी भरली नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणार्या वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सचिव संदीप गुंजाळ, प्रकाश बेरड, रामदास ससे, यशवंत तोडमल, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे गजानन भांडवलकर, दादा दरेकर आदी उपस्थित होते. गॅलॅक्सी नॅशनल स्कूलमध्ये भीमराज गुंजाळ यांचे पाल्य ओम गुंजाळ (इ. 8 वी) व जय गुंजाळ (इ. 6 वी) मध्ये शिक्षण घेत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात काही कारणास्तव गुंजाळ यांनी शाळेची फी भरली नाही. फी न भरल्याने शाळेने ऑनलाईन शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड दिला नाही. सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहे. संपुर्ण वर्ष होत आले असताना विद्यार्थ्यांना शाळेकडून कोणत्याही प्रकारचे शिक्षण देण्यात आलेले नाही.
या संदर्भात पालकांनी शालेय प्रशासनाशी वारंवार फोन केला असता तसेच शाळेत जाऊन भेट घेतली असता कोणतेही म्हणने ऐकून घेण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
सदर शाळेवर इतर पालकांनी देखील कोरोना काळात अवाजवी फी वसुली केल्याचा आरोप केला असून, या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना पत्र पाठवून त्रिस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे.
शालेय शुल्क अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करता येणार नसल्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहे. या आदेशाची शिक्षण विभागाने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गॅलॅक्सी नॅशनल स्कूलने फी न भरल्याने सदरील विद्यार्थ्यांना शाळेतून कमी केले आहे. या दोन्ही मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. याला पूर्णपणे शालेय प्रशासन जबाबदार राहणार आहे.
फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना त्वरीत शाळेत घ्यावे, तर फी अभावी शाळेतून विद्यार्थ्यांना काढणार्या गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शालेय शुल्क अभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा गुन्हा आहे.
गॅलॅक्सी स्कूलप्रकरणी राज्य शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांना कळविण्यात आलेले असून, त्यांनी देखील शिक्षण विभागाशी संपर्क साधून कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहेत.
तात्काळ सदर शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत घ्यावे अन्यथा गट शिक्षणाधिकारी यांना बरोबर घेऊन सदर शाळेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी दिला आहे.
ओम गुंजाळ व जय गुंजाळ या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्याबाबत व ऑनलाइन शिक्षणापासून वंचित न ठेवण्याचे शिक्षण विभागाच्या वतीने गॅलॅक्सी नॅशनल स्कूलला कळविण्यात आले होते.
तथापि याबाबत शालेय प्रशासनाने कार्यवाही केलेली आढळून येत नसल्याने व कारवाईचा अहवाल देखील शिक्षण विभागाला सादर केलेला नसल्याने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम 16 चा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे.
तर शिक्षण उपसंचालकांना सदर शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारसचे पत्र प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी काढले आहे.