रस्त्यावरील खड्ड्यावरून ‘प्रहार’ चा बांधकाम विभागावर प्रहार…खड्डेमुक्त करा अन्यथा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सातत्याने अपघात होत असतात व निरपराध नागरिकांचा बळी जात असतो.

सध्या स्थितीला श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव महामार्गावर खड्डेच खड्डे झाले असून हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठीं ऑगस्ट अखेर पर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपुर-नेवासा-शेवगाव महामार्गावर खड्डे पडून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खराब झाल्या आहेत.

हा रस्ता असाच पुढे शेवगावपर्यंत पूर्णपणे खराब झालेला आहे. याच रस्त्याने इतर वाहतुकीसोबत मोठ्या प्रमाणात सात ते आठ साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सुरू असते.त्या काळात अपघाताचे प्रमाण वाढत असते.

ऑगस्ट अखेर पर्यंत श्रीरामपूर-शेवगाव रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24