अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- कोरोनाशी लढा देण्यासाठी मन व शरीर सदृढ करण्याची गरज आहे. रुग्णांमध्ये बरे होण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्यास ते या आजारावर सहज मात करु शकतात.
कोरोना रुग्णांना सकस आहार व नियमीत प्राणायाम आरोग्यासाठी लाभदायक ठरत असल्याचे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले.
वाळूंज (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित कोविड सेंटर मध्ये कोरोनाशी लढताना आहार व व्यायाम या विषयावर मार्गदर्शन करताना बोडखे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के,माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, माजी सरपंच बाळासाहेब दरेकर,
भाऊ पांडूळे, विराज बाबासाहेब बोडखे आदी उपस्थित होते. पुढे बोडखे म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी श्वसन तंत्र मजबूत करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी नियमीत प्राणायामाची गरज आहे.
वैद्यकिय औषधोपचारासह प्राणायाम केल्याने दम लागणे, कफ जमणे, फफ्फुसावर सूज येणे आदी कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागत नाही.
तसेच कोरोनाची बाधा झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तर आपल्या मुल-बाळांसह संपुर्ण कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली असता,
त्यातून बाहेर पडताना आलेले अनुभव त्यांनी विशद केले. विराज बोडखे याने प्राणायामाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकासह दाखवून रुग्णांकडून करुन घेतले.
बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे म्हणाले की, बोडखे यांनी कोरोना रुग्णांना मार्गदर्शन करुन त्यांच्यामध्ये एकप्रकारे आत्मविश्वास निर्माण केला आहे.
स्वत: कोरोनाशी कसे लढले? याबद्दल माहिती देतांना त्यांनी विविध व्यायाम व आहाराबद्दलची दिलेली माहिती उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
उपसभापती संतोष म्हस्के यांनी बाबासाहेब बोडखे यांनी कोरोनासह इतर कारणांनी पालकांचे मृत्यू होऊन अनाथ झालेल्या बालकांचे उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.