अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- सर्वांच्या सहकार्याने सुरु झालेले प्रवरा कोव्हीड केअर सेंटर हे सामान्य माणसाला आधार ठरले. या कोव्हीड केअर सेंटरमधुन ८०० रुग्णांवर मोफत उपचार झाले.
कोव्हीड योध्यांच्या माध्यमातून सेवा देता आल्याचे समाधान मोठे असल्याचे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
शिर्डी विधानसभा मतदार संघात कोव्हीड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणा-या सरकारी वैद्यकीय आधिकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचा-यांसह रुग्णवाहीका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्टाफचा कोव्हीड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.
लोणी येथील प्रवरा कोव्हीड केअर सेंटरमधील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना शाल व स्मृतीचिन्ह देवून गौवविण्यात आले.
माजीमंत्री आ.आण्णासाहेब म्हस्के पाटील, सभापती सौ.नंदाताई तांबे, चेअरमन नंदु राठी, भाजपाचे सरचिटनिस अॅड.ऋषिकेश खर्डे, भाजयुमोचे सतिष बावके आदि याप्रसंगी उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ७ वर्षे पुर्ण झाली. या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा ही संघटन या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्य सेवांचे उपक्रम तसेच कोव्हीड योध्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रवरा कोव्हीड सेंटरमध्येही मागील दोन महीन्यांपासुन आरोग्य सेवा देणा-या कोव्हीड योध्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, कोव्हीडचे दुसरे संकट सर्वांनाच घाबरवून सोडणारे होते.
ग्रामीण भागात या दुस-या लाटेने समाज जिवन भयभित झाले. खासगी रुग्णालयात आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळेच प्रवरा कोव्हीड केअर सेंटर सुरु करावे लागले. अतिशय कमी कालावधीत सर्वांच्या सहकार्याने सुरु झालेल्या सेंटरमधील ८०० रुग्ण आत्तापर्यंत यशस्वी उपचार घेवून घरी गेले.
या सर्व कामाच्या पाठीमागे मानवतेचा दृष्टीकोन होता आणि संकटाच्या काळात समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची प्रवरा परिवाराची परंपरा होती. या कोव्हीड सेंटरमधून सर्व कोव्हीड योध्यांनी केलेल्या निरपेक्ष सेवेच्या माध्यमातून समाजाला आधार देता आला हे मोठे समाधान असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.
माजीमंत्री आ.आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीमागे उभे राहण्याचे परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे. यातूनच प्रवरा कोव्हीड केअर सेंटरचे यशस्वी काम आज सर्व समाजासमोर दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयाचा समाजाला आधार वाटतो. मोफत लसीकरण करुन, केंद्र सरकारने सर्वांनाच दिलेला दिलासा महत्वपुर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.