पोलीस असल्याची बतावणी करून भंगार असलेला ट्रक पळविला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी पोलिस ठाणे हद्दीतील धरमाडी टेकडी जवळ दिनांक २७ मे रोजी एक ट्रक रस्त्याने भंगार घेऊन जात होता.

यावेळी विना क्रमांकच्या इरटिगा गाडीतून आलेल्या अज्ञात चार भामट्यांनी ट्रक चालकाला पोलिस असल्याचे सांगून ट्रक थांबवीला. ट्रक चालकाचे अपहरण करून सुमारे सहा लाख रूपये किंमतीचा भंगारचा माल भरलेला ट्रक घेऊन भामटे पसार झाले.

दिनांक २७ मे रोजी पहाटे सहा वाजे दरम्यान श्रीधर जंगलू सोनवणे वय ३४ वर्षे, राहणार लजपतराय वाडी, एकलहरे ता. श्रीरामपुर. हा ट्रक चालक त्याच्या मालकीची गाडी नंबर एम. एच. ४२ एम ९४८२ मधून भंगारचे सामान घेवून जात होता.

यावेळी यातील अनोळखी चार भामटयांनी ट्रक चालकाला पोलीस असल्याचे सांगून ट्रक नगर मनमाड राज्य महामार्गावर धरमाडी टेकडी जवळ थांबवीला. तसेच ट्रक चालकाला बळजबरीने दमदाटी करून त्याला पांढऱ्या रंगाच्या विनानंबरच्या इरटिगा गाडीमध्ये बसवून अपहरण केले.

चार भामट्यां पैकी एकाने भंगार सामानाने भरलेला ट्रक नगरच्या दिशेने घेऊन गेला. यावेळी ट्रक चालकाला वरवंडी गावचे शिवारात निर्जन जागेवर गाडीतून उतरवून शिवीगाळ केली. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून सोडुन दिलेले आहे.

ट्रक चालक श्रीधर जंगलू सोनवणे हा कसाबसा राहुरी पोलिस ठाण्यात पोहचला. आणि घटनेची माहिती दिली. या घटनेत १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा अशोक लेलंड एम. एच. ४२ एम ९४८२ क्रमांक असलेला ट्रक, ९९ हजार ७२० रूपये किंमतीचे अल्युमिनियम,

१ लाख १८ हजार ८० रूपये किंमतीचे ब्रास, १ लाख ९२ हजार ६६० रूपये किंमतीचे कॉपर, ५ हजार ९२० रूपये किंमतीचे स्टील असा एकूण ५ लाख ६६ हजार ३८० रूपयांचा मुद्देमाल घेऊन भामट्यांनी पोबारा केला.

ट्रक चालक श्रीधर सोनवणे याच्या फिर्यादीवरून अज्ञात चार भामट्यांवर अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निरज बोकिल हे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24