अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सल्लागार पी.के. सिन्हा यांनी मंगळवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.
नृपेंद्र मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर 2019 पासून पी.के सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागाराची जबाबदारी सांभाळत होते. सोमवारीच पी.के सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते.
माजी कॅबिनेट सचिव पी.के सिन्हा यांची 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. सिन्हा यांची पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पी.के सिन्हा यांनी अलाहाबादमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 2015 मध्ये केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव पी.के सिन्हा यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढविला होता.
कॅबिनेट सेक्रेटरीचा कार्यकाळ हा साधारण दोन वर्षांचा असतो. यूपी केडरचे आयएएस अधिकारी पी.के सिन्हा पूर्वी ऊर्जा सचिव होते.
1977-78 बॅचच्या सचिवांमध्ये ते सीनियर होते आणि म्हणूनच त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांची कॅबिनेट सचिवपदी नेमणूक करण्यात आली होती.
पी.के. सिन्हा हे पंतप्रधान कार्यालयातील दुसरे असे अधिकारी आहेत ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.