अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- निष्काळजीपणा आणि गैरसमजुतींमुळे कोरोना वाढत आहे. लस आल्यामुळे आता सगळे काही ठीक होईल, असे लोकांना वाटते. परंतु कोरोना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी आणखी सहाहून अधिक लशींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी केली. भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रीसर्च एनव्हायर्नमेंटल हेल्थ’च्या नव्या ग्रीन कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री बोलत होते.
मंत्री हर्षवर्धन म्हणाले,देशात लसीच्या एक कोटी ८४ लाख मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २० लाख मात्रा शुक्रवारी एकाच दिवसात देण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोरोनाच्या दोन लशींची निर्मिती करण्यात आली असून त्या ७१ देशांना देण्यात आल्या आहेत.
आणखी अनेक देश लशींची मागणी करत आहेत. कॅनडा, ब्राझील आणि इतर विकसित देशही भारतीय लशींचा उत्साहाने वापर करत आहेत, असे हर्षवर्धन म्हणाले. पूर्वी देशात करोना संसगाचे निदान करण्यासाठी एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता आपल्याकडे अशा २,४१२ प्रयोगशाळा आहेत, याचा हर्षवर्धन यांनी उल्लेख केला.
आतापर्यंत कोरोनाच्या २३ कोटी चाचण्या झाल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. विज्ञानाचा आदर करा. कोरोनाविरुद्धचा लढा हा वैज्ञानिक लढा आहे, राजकीय नाही. त्यामुळे लशीवरून होणारे राजकारण बंद करण्याची आवश्यकता आहे, असेही हर्षवर्धन म्हणाले.