अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- श्रीकृष्णाचं जन्मस्थान मानलं जाणारं मथुरा वृंदावन हे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय़ उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरापासून 10 किलोमीटर परिसरातील सर्व मांसविक्री आणि मद्यविक्री करणारी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचे साधुसंतांनी जोरदार स्वागत केले. धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून मथुरेचा विकास करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. अयोध्या, वाराणसी, मथुरा आणि नद्यांच्या संगमाचे ठिकाण असलेल्या प्रयागराज या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता आदित्यनाथ सरकार प्राधान्याने काम करत आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीतील एक टप्पा म्हणून दारू आणि मांस विकण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन मथुरेचा विकास केला जाईल. मथुरेत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल; असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले.
भविष्याचा विचार करुन विकासाचे नियोजन केले जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. 10 किमी परिसरात मांसविक्री बंद मथुरेचा परिसर तीर्थक्षेत्र जाहीर झाल्यामुळे आता 10 किलोमीटर परिसरात कुठेही मांस आणि मद्यविक्रीला परवानगी असणार नाही.
या भागात सध्या अनेक मांस आणि मद्यविक्री करणारी दुकानं आहेत. या सर्व दुकानांना इतरस्तर हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार करणार पुनर्वसन सरकारच्या या निर्णयामुळे मांस आणि मद्यविक्री करणाऱ्या अनेकांचं नुकसान होणार आहे.
मात्र अशा सर्व व्यावसायिकांचं पुनर्वसन केलं जाईल आणि कुणाचंही नुकसान होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.