शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करुन द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी प्रत्येक बँकांनी आतापर्यंत वाटप केलेल्या पीककर्जाचा आढावा घेतला. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक वगळता राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अतिशय अल्प आहे.

वास्तविक या बँकांनी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जासाठी वेळेत मंजूरी देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरु झाला आहे. अशावेळी वेळेवर कर्ज मिळाले नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

जिल्ह्याच शेती हा मुख्य उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करुन द्यावे. प्रत्येक बँकांना उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहे. असे असतानाही राष्ट्रीयकृत बॅंकांची कामगिरी समाधारकारक नाही.

येत्या पंधरा दिवसात ही कामगिरी सुधारावी आणि कर्ज वितरणाचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी  क्षीरसागर यांनीही, जिल्ह्यात स्वयंसहायता बचत गटाने कर्ज प्रकरणासाठी दिलेले अर्ज ज्या बँकांकडे प्रलंबित आहेत, त्यांनी ते तात्काळ मार्गी लावावेत, अशी सूचना केली.

अहमदनगर लाईव्ह 24