अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. यातच राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केली आहे.
दरम्यान अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्ट मधून एसटीच्या ज्या कर्मचार्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटूंबियांना 20 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केली आहे.
राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप एसटीच्या इतिहासात मोठा संप असल्याचे प्रथमच प्रवाशांना पहावयास मिळाला आहे. संप काळात कर्मचार्यांना आत्महत्या करावी लागली, ही दुर्दैवी घटना आहे.
एसटी संपाच्या काळात राज्यातील 42 एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केली असून त्यांचा परिवार उध्वस्त झाला आहे. राज्य शासनाने एखाद्या प्रवाशाला प्रवास करताना अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना 10 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यासाठी अपघात सहाय्यता निधी योजनेची स्थापना करून विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले.
या योजनेत निधी जमा करण्यासाठी प्रवासी जनतेकडून दर प्रवासातील तिकीटामागे एक रुपया विशेष निधी वसूल करण्यात येत आहे. त्या जमा होणार्या निधीतून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात येते.
दरम्यान अपघात सहाय्यता निधी योजनेत 400 कोटींपेक्षा जास्त निधी जमा आहे. सदरचा पैसा जनतेचा असून त्यामुळे या निधीतून विशेष बाब म्हणून विश्वस्त मंडळाच्या सभेत ठराव करून त्या 42 एसटी कर्मचार्यांना कुटुंबातील उदरनिर्वाह व पाल्याची शिक्षणाची व्यवस्था होण्यास प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी श्रीगोड यांनी केली आहे.