अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- खरिपात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांनी त्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संदीप वालावलकर, नाबार्डचे जिल्हा उपमहाव्यवस्थापक शीलकुमार जगताप, आरसेटीचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भोसले यांनी प्रत्येक बँकांनी वाटप केलेल्या पीक कर्जाचा आढावा घेतला.
बैठकीला विविध बँकांचे जिल्हा व्यवस्थापक, राज्य शासनाच्या विविध महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.