अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे अद्यापही जिल्ह्यात कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मात्र नागरिकांसह काही दुकानदारांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नुकतेच अहमदनगर महापालिकेने कठोर निर्बंधांची मुदत १५ मे पर्यंत वाढविली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या माळीवाडा येथील दुकानदारांवर भरारी पथकाने कारवाई केली.
त्यामुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहरातील माळीवाडा, सावेडी, तोफखाना आणि गंजबाजार आदी भागांतील दुकानदारांनी दुकाने उघडली व किराणा मालाची विक्री सुरूच ठेवली होती.
दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी कारवाई करीत १७ हजारांचा दंड वसूल केला. दुकानांचे शटर बंद करून विक्री करण्याचे प्रकार सुरूच असून, पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे पालन न केल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.