अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यासह जिल्हापातळीवर पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. दररोज हजारच्या वरती रुग्णसंख्या मिळत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.
यातच नगर जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे थेट रस्त्यावर उतरले.
विनामास्क फिरणार्या आणि प्रवास करणार्या नागरिकांवर आणि शासकीय कार्यालयात विनामास्क वावरणार्या कर्मचार्यांवर थेट दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत आहे.
बेजबाबदार नागरिकांमुळे जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात येत असून अशा नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात विनामास्क नागरिक आढळून येतील,
अशा दुकानांवर महिनाभर बंदी घालण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोना संसर्ग वाढत असून नागरिकांनी स्वताच्या आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर जिल्हावासियांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.