अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव शहर व तालुका क्षेत्रात कोरोना नियमांना डावलणाऱ्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहर व तालुका पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ११४ नागरिकांना प्रत्येकी १०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
त्यांच्याकडून एकूण १२ हजार ४०० रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. दरम्यान; जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासनची डोकेदुखी वाढू लागली आहे.
मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिक मास्कचा वापर करताना दिसत नाही आहे. याबाबत आता प्रशासन आक्रमक झाले असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई तीव्र आणि वेगवान करण्यात आली आहे.
कोपरगाव शहरात शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मास्कचा वापर न करणाऱ्या ८० नागरिकांवर कारवाई केली.
त्यांच्याकडून आठ हजाराचा दंड वसूल केला तर दुसरीकडे ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चांदेकसारे झगडेफाटा येथे तब्बल ३४ जणांवर कारवाई करत ४४०० दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर ‘मास्क’ लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
तसेच ‘मास्क’चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये २०० इतका दंड आकारण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जनजागृती देखील करण्यात आली आहे,
असे असले तरी त्याचे गांभीर्य समजून न घेता मास्क वापर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात प्रारंभापासूनच कारवाई करण्यात येत आहे. आता ही कारवाई अधिक तीव्र व वेगवान झाली आहे.