अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर बनत चालली आहे, यामुळे पुन्हा एकदा कठोर नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.
नुकतेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी नुकतेच आदेश काढून गावामध्ये विनामास्क फिरणाऱ्या व्यक्ती,
कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना केल्या होत्या.
त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील तिसगाव पंचायत समितीच्या पथकाने मिरीत कोरोनाबाबतचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
यावेळी २७ जणांकडून दंड वसूल करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाबाबत जनजागृती केली. दरम्यान या कारवाईमध्ये विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांच्यासह ग्रामसेवक रवी देशमुख,
राजेंद्र साखरे, प्रमोद मस्के, ग्रामपंचायत कर्मचारी जयदीप गवळी, संभाजी घोरपडे आदींनी सहभाग घेतला. पथकाने ग्रामस्थांना नियमित मास्कचा वापर करणे,
सामाजिक अंतर नियमाचे पालन करणे, विनाकारण घराबाहेर पडू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, याबाबत मार्गदर्शन केले.