अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.
ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. दरम्यान बँक खाते सील करुन पीएफच्या थकबाकी 1 कोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती.
थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.
भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांत विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे याची बहिण आणि खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही.
त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राजीनामे सत्र सुरू केले होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.