राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करा…! अन्यथा महागात पडेल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- सध्या सुप्तावस्थेत कोरोना वाढतो आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका.राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करा. आज आपण दुर्लक्ष केले तर महाग पडेल. तिसऱ्या लाटेचा धोका थोपविण्यासाठी स्थानिक पातळीवर पथके तयार करा.

याकामी ग्रामसुरक्षा दल, गावातील सेवा निवृत्त लष्करी जवानांची मदत घ्या. केंद्र व राज्याच्या दिशादर्शक आदेशांचे जबाबदारी पूर्वक पालन करा, असे आवाहन राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे. कोरोना उपायोजना आणि सद्यस्थिती व  संभाव्य परिस्थिती संदर्भात नगर तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी,

ग्रामसेवक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सध्या तालुक्यातील अनेक गावात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कमी झालेली संख्या वाढते आहे, याचे कारण म्हणजे गाफीलपणा आहे . आता कोरोना गेला, असे म्हणत दुर्लक्ष केले तर महाग पडेल.

सध्या सुप्तावस्थेत कोरोना गावात शिरू पाहतोय. फ्रन्टलाइन वर्करच्या स्वरूपात जबाबदारी स्वीकारून कोरोना थोपवण्याचे काम करावे लागेल. पॉझिटिव्ह होण्याची कारणे लक्षात घेत विनाकारण फिरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागेल. कोरोनाची भीती नको. मात्र, दक्षता घ्यावी.

गावातील लसीकरणाबाबत पाठपुरावा करीत मास्कचा वापर करा. कोरोनाचा वाढता आलेख रोखा. परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर तिसरी लाट भयानक असेल, असा कळकळीचा इशारा देखील पवारांनी दिला. पवार म्हणाले, मागील दीड वर्षाच्या काळात कोरोनामुळे परिवारातील, गावातील दिशादर्शक असणारे अनेक जण आपण गमावले आहेत.

ते लक्षात घेऊनकोरोनास सहज घेऊ नका. जबाबदारी म्हणून नियम पाळा. नगर तालुक्यात अनेक गावांनी दिशादर्शक काम केले आहे. पुढच्या काळात आपण एकत्रितपणे काम करू. राज्यात सध्या एकीकडे दुष्काळ दुसरीकडे महापूर आणि तिसरीकडे कोरोनाचे संकट अशी परिस्थिती आहे.

या परिस्थितीत विकास कामे गतीमान ठेवताना कोरोनाला रोखावे लागेल. येथे पेशंट वाढत आहेत तेथे क्वारंटाईन सेंटर उभारा.  श्रावण महिन्यातील अनेक उत्सवात एकत्र येण्याची प्रक्रिया थांबवावी लागेल. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित काम करावे.

अहमदनगर लाईव्ह 24