अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- पारनेर तालु्क्यातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या सामाजिक कामाचे महाराष्ट्र कौतुक करीत आहे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते अल्पावधीतच पक्षश्रेष्ठींचेही लाडके झालेत.
स्वतःहून पवारांच्याच नावाने तब्बल अकराशे बेडचे कोविड सेंटर लंके यांनी उभारून सामान्य माणसाला मदतीचा हात दिला आहे. आमदार नीलेश लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे बुधवारी रात्री निधन झाले.
रात्री अंत्यसंस्कार उरकून आ. निलेश लंके हे सुतक असताना रात्रीच बारा वाजण्याच्या सुमारास भाळवणी येथील कोव्हिड सेंटरला दाखल झाले होते.
आ. लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके हे कोरोनाची बाधा झाल्याने रूग्णालयात उपचार घेत होते. पुढील पाच दिवसांत त्यांना रूग्णालयातून सोडण्यात येेईल असेही डॉक्टरांनी सांगितले होते.
मात्र फुफूस निकामी झाल्याने बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमरास त्यांचे निधन झाले. रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर आ. लंके यांनी रात्री बारा वाजता भाळवणी येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होत रूग्णांची विचारपूस केली.
आरोग्य यंत्रणेशी संवाद साधून रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांचीही माहीती घेतली. गुरूवारी सकाळी सावडण्याचा विधी झाल्यानंतर आ. लंके पुन्हा जनतेच्या सेवेत दाखल झाले.
रूग्णांची विचारपूस, त्यांच्या प्राणवायूच्या पातळीची तपासणी, भेट देण्यासाठी आलेल्या नागरीकांशी संवाद असा त्यांचा नित्याचा दिनक्रम सुरू झाला.चुतत्यांच्या मृत्यूचे दुःख आहेच,
मात्र कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाशी लढा देणाऱ्या मायबाप जनतेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? ही जनता हेच माझे कुटूंब आहे. या कुटूंबाची काळजी घेणे कुटूंबप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे असे आ. लंके यांनी यावेळी सांगितले.