अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-शेतीच्या बांधावरून दोन चुलत भावांमध्ये भांडण झाले. यावेळी प्रशांत गागरे या तरूणावर कुर्हाडीचा वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या एकास तातडीने रुणालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर लोणी येथील रूग्णालयात उपचार सुरू असून रूग्णालयाच्या अहवालानुसार राहुरी पोलीस ठाण्यात दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रशांत शिवाजी गागरे (वय 32 वर्षे) हे आपल्या कुटूंबासह राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील दत्त मंदिराजवळ राहतात. त्यांची तांभेरे ग्रामपंचायत हद्दीत शेती असून त्यांच्या चुलत भावाशी शेतीच्या बांधावरून वाद आहेत.
प्रशांत गागरे हा घरी असताना शेतीचा बांध सरकला या कारणावरून प्रशांतचा चुलत भाऊ राधेश्याम गागरे हा प्रशांतच्या आईला म्हणाला, तुम्ही जास्त माजले आहेत. आज तुमचा बेत पाहतो.
असे म्हणून त्याने कुर्हाड काढून कुर्हाडीचा दांडा प्रशांतच्या पाठीत मारला. कुर्हाडीचा वार वाचविताना प्रशांतच्या तळ हातावर वार झाला.
यावेळी प्रशांतचा भाऊ अविनाश याने तातडीने प्रशांतला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. प्रशांत याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच ठिकाणाहून त्याने पोलिसांना जबाब दिला. त्यावरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.