शिवसेनेचा नगरपालिका कार्यालयातील राडा, दोन नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोपरंगाव येथील नगरपालिका कार्यालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोड करून उपमुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२२) घडली आहे.

या प्रकरणी दोघा नगरसेवकांसह इतर पाचजण अशा एकूण सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शहरवासियांत चर्चा झडत आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या दोन टपऱ्या प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या आदेशानुसार काढण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ हे सकाळी गेले

असता त्यांना दमदाटी केली. त्यानंतर पालिका कार्यालयातील बांधकाम विभागातील संगणक, खुर्ची व काचा फोडून नुकसान केले. तसेच उपमुख्याधिकारी गोर्डे यांना शिवीगाळ व मारहाण करून मोठमोठ्याने आरडाओरड केली.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सनी रमेश वाघ, योगेश तुळशीदास बागुल, कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे,

साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निळंक यांच्याविरुद्ध गुरनं.२३९/२०२१ भादंवि कलम ३५३, ३३२, १८९, ३२३, ४२७, १२० (), १८८, २६९, २७०, १४३, १४७, १४९ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. सी, नागरे हे करत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24