भाडेवसुलीसाठी राहाता नगरपरिषद आक्रमक; व्यावसायिकांचे विखे पाटलांना साकडे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- राहाता नगरपरिषदेच्या मालकीचे असलेल्या गाळ्याची गेल्या अनेक वर्षांपासून काही गाळेधारकांनी गाळेभाडे रक्कम नगरपरिषद कार्यालयात जमा केली नसल्याने त्यांची थकीत रक्कम कोटी रुपयांच्या पुढे गेली असल्याने नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी वसुली करणे गरजेचे असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

यासाठी आता नगरपरिषदेने गाळेधारकांकडून सक्तीने भाडेवसूली सुरु केली आहे. सदर सक्तीची वसुली तात्काळ बंद करावी व बिलाची रक्कम भरण्यासाठी हप्ते करून द्यावेत, अशी मागणी राहाता येथील गाळेधारकांनी आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान राहाता नगरपरिषदेने नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, तसेच आ. राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल याठिकाणी असलेल्या गाळेधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून थकित असलेले गाळा भाडे रक्कम त्वरित भरावे, अशी लेखी सूचना केली होती.

मात्र सूचना करूनही गाळेधारकांनी थकीत गाळे रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात न केल्याने राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांनी गेल्या आठवड्यापासून थकीत गाळे भाडेधारकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

कारवाईच्या भीतीने व्यावसायिकांनी थेट आ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. निवेदनात म्हटले आहे की, करोनामुळे सर्वत्र आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाल्याने आमच्याकडे 1 वर्षाचे भाडे थकले आहे. राहाता नगरपरिषदेने भाडे रकमेत जीएसटी रकमेची आकारणी केली आहे.

तसेच दर महा थकीत भाडे बिल रकमेत 2 टक्के व्याज व करोना काळातील 2 वर्षाचे गाळेभाडे माफ करावे, अशी सर्व गाळेधारकांची मागणी आहे.

Ahmednagarlive24 Office