अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपुत यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी निरीक्षक दुधाळ यांची मुंबई शहर ते अहमदनगर अशी बदली दर्शविण्यात आली होती.यामुळे ते अहमदनगर पोलीस दलात हजर झाले होते.
अधीक्षक पाटील यांनी त्यांच्याकडे राहुरी पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली होती. परंतु, मुंबई शहर ते अहमदनगर येथे करण्यात आलेल्या बदली आदेशामध्ये अंशत: बदल करून त्यांचे विनंतीनुसार नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली असल्याने त्यांना अहमदनगर जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील एका बैठकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे व पोलिस निरीक्षक दुधाळ यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. अशा चर्चा सध्या तालुक्यात रंगू लागल्या आहेत.