भुयारी मार्गाच्या प्रश्नी रेल्वे रोको आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- राहुरी रेल्वे स्टेशन येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाऊसाचे साठत असलेल्या पाण्याचा निचरा होण्याचे काम रेल्वे विभागाने सुरू केले असून काम अंतिम टप्प्यात असल्याने राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटना व पूर्व भागातील नागरिकांच्या वतीने दि.१० जुलै रोजी करण्यात येणारे रेल्वे रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

राहुरी रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गाच्या ठिकाणी पाऊसाचे पाणी साठत असल्याने व पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली होती.

याबाबत पाण्याचा निचरा होण्याचे काम तातडीने करावे अन्यथा दि.१० जुलै रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे, माजी उपसरपंच बाळासाहेब पेरणे, पत्रकार विनित धसाळ, अमोल पेरणे, ओंकार म्हसे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला होता.

निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेल्वे विभागाने तातडीने पाण्याचा निचरा होण्याचे काम सुरू केले होते. आजमितीस सदर काम अंतिम टप्प्यात आहे.

पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होणार असल्याचे नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून पाहिले असून सदर रेल्वे रोको आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24