अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे.
यामुळे भंडारदरातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर पोहचला आहे. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात नवीन पाण्याची विक्रमी आवकझाली. गत 24 तासांत 653 दलघफू पाणी दाखल झाल्याने सायंकाळी 6 वाजता 6449 दलघफू (58.42 टक्के) पाणीसाठा झाला होता.
रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साठा 6612 दलघफूवर (60 टक्के) पोहचला होता. पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास आज शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत या धरणातील पाणीसाठा 65 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सुरूर असलेल्या पावसामुळे मुळात आवक चांगली होत असल्याने हे धरण 44 टक्के भरले आहे. वाकी, शिरपुंजे तलावही तुडूंब झाले आहेत. कुकडी प्रकल्पातील चार धरणांमध्ये आवक वाढल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा 32 टक्के झाला असून सर्वात मोठे असलेले डिंभे धरण निम्मे भरले आहे.
भंडारदरा, वाकी परिसरात जोरदार सरी कोसळत असल्याने 112 दलघफू क्षमतेचा तलावही काल ओव्हरफ्लो झाला. काल सायंकाळी या तलावातून 1033 क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे आता कृष्णवंती नदीही खळखळू लागली असून निळवंडेत पाणी वाढू लागले आहे.