अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-यावर्षी सर्वत्र मुबलक पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहे. मात्र यावर्षी देखील आरोग्याचा प्रश्न जनतेला भेडसावणार आहे.
आखाती देशांमध्ये युद्ध होऊन नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये येणार, याचा जगभरातील जनतेला व राजाला त्रास होणार आहे, असे भाकीत कर्जत येथील संत गोदड महाराज यांच्या संवत्सरी मध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
कर्जत येथील संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षाची संवत्सरी लिहून ठेवली आहे. दरवर्षी गुडीपाडव्याच्या दिवशी या संवत्सराचे वाचन मंदिरांमध्ये करण्यात येते. यामध्ये पिकपाणी, राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत करून ठेवले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही चैत्र पाडव्याच्या दिवशी श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे व अनिल महाराज काकडे यांनी या संवत्सरी चे वाचन केले. दरवर्षी हे भाकीत ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक मंदिरात येत असतात.
परंतु या वर्षी कोरोनामुळे भाविकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. यामुळे मंदिरात मध्ये मोजक्या पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत वाचन करण्यात आले. यावर्षी या वर्षीच्या संवत्सराचे नाव प्लवंग संवत्सरी असून याचा स्वामी मंगळ आहे.
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे. पिके देखील चांगली येणार आहेत. मात्र आखाती देशांमध्ये आगी लागण्याच्या घटना घडतील. याशिवाय पश्चिम विभागामध्ये चक्रीवादळाचा धोका संभवणार आहे.
यामुळे अराजकता माजेल, आखाती राष्ट्रांमध्ये पुन्हा युद्ध भडकून याचा त्रास राजा आणि जनतेला होणार आहे. यावर्षीदेखील आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा राहणार आहे, असे या संवत्सराचे भाकीत सांगण्यात आले असून हे भाकीत संपूर्ण जगाच्या बाबतीत वर्तविण्यात येते.