अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- गेल्या १४ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी पाच ते सहा दिवस तो रखडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात आणखी आठ दिवस तरी मोठा पाऊस होणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
परिणामी पीक-पाण्याच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची टांगती तलवार तर धरणांतील जलसाठा घटत असल्याने पिण्याच्या पाण्यावरही कपातीचे सावट आहे.
मोसमी पाऊस ३ जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने अतिशय वेगाने प्रवास करीत तीनच दिवसांत महाराष्ट्र गाठला आणि पुढील चार ते पाच दिवसांत निम्म्या भारतात प्रगती केली होती.
या काळात राज्यासह इतर भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. उत्तर-पूर्व दिशेनेही त्याने वेगाने प्रगती करून हिमालयाच्या पायथ्याशी आणि जम्मू-काश्मीर भागांत ११ ते १४ जूनला धडक दिली. या दरम्यानही देशात बहुतांश भागात पाऊस होता.
१९ जूनपर्यंत मोसमी पावसाची प्रगती वेगाने सुरू होती. या दिवशी त्याने दिल्लीत धडक मारली. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि चंडीगड आदी राज्यांच्या काही भागांत त्याने प्रवेश केला होता. उत्तर भागात लवकर पोहोचूनही मोसमी पावसाचा प्रवास सध्या थांबला आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस केवळ हलक्या सरींची शक्यता आहे. कोकणात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणीच पाऊस होणार आहे.
४ आणि ५ जुलैला या दोन्ही विभागांत तुरळक भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणीच पुढील चार दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात पाऊस होण्यासाठी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र पट्टे आणि जमिनीवर बाष्प खेचून आणणाऱ्या वाऱ्यांची आवश्यकता असते. सध्या अशी कोणतीही स्थिती दिसत नाही.
त्यामुळे पुढील आठवडाभर तरी राज्यात जोरदार किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यंदा द्रुतगतीने पाऊस १३ जूनलाच या भागांत पोहोचला होता. १९ जूननंतर मात्र त्याचा प्रवास थांबला तो अद्यापही सुरू होऊ शकलेला नाही.
कोरडवाहू भागांमध्ये अनेक ठिकाणी पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता पावसाची आवश्यकता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही भागांत जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत.
ढगाळ वातावरण दूर होऊन उन्हाचा चटका राज्यात वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावाही कमी होत आहे. अशा स्थितीत जूनमध्ये पेरण्या झालेले शेतकरी चिंतेत आहेत.