अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- अनुकूल स्थितीअभावी गेल्या १९ दिवसांपासून वायव्य भारताच्या सीमेवर रखडलेला मान्सून गुरुवारपासून (दि. ८ जुलै) सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली आहे. राज्यात दि. ८ ते ११ जुलैदरम्यान पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
यंदा दोन दिवस उशिराने तीन जून रोजी केरळात दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेगाने महाराष्ट्रापर्यंत प्रगती केली. त्यानंतर मात्र मान्सूनचा वेग मंदावला. मान्सून १९ जून रोजी वायव्य भारताच्या सीमेपर्यंत पोहोचला.
अनुकूल स्थितीअभावी गेल्या १९ दिवसांपासून मान्सून तेथेच थबकला आहे. दरम्यान, राज्यातील पावसाचाही जोर ओसरला.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक जिल्ह्यांत सरासरीहून जास्त पडलेल्या पावसात गेल्या १५ दिवसांपासून खंड पडला आहे.पुणे वेधशाळेनुसार राज्यात दि. ८ ते ११ जुलै या काळात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.
या काळात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल.