अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पत्र लिहिलं आहे. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.
यावेळी राज यांनी मोदींना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे कि, कोरोनाविरूध्दच्या ह्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. ह्यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा.
अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिविरच्या वितरणाची यंत्रणा स्वतःकडे ठेवू नये. ह्यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच शिवाय त्यांच्याकडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे असं दिसतं.
याबाबतीत माझी आपल्याला नम्र विनंती आहे की रेमडेसिविर कसं घ्यायचं, कुठे, कसं वितरित करायचं ह्याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी.
ते काम खरंतर केंद्राचं नाही. कोरोनाविरूध्दची ही लढाई मोठी आहे. तिथे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे.
राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीनं उपयोग करून घ्यायला हवा.
आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पध्दतीचा आत्माही तोच आहे. मला आशा आहे की आपण माझ्या ह्या विनंतीचा सकारात्मक विचार कराल आणि राज्य सरकारांना ह्या बाबतीतील प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल.