अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 मार्च रोजी राज्यभर रास्ता रोको करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
तसेच उद्या दि. 14 पासून सरकारच्या निर्णयाच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री यांचे पुतळे जाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद पडल्याने लाखो लोकांचा रोजगार बुडाला. हजारो कामगारांच्या नोकर्या गेल्या.
यातच लॉकडाऊन काळात महावितरण कडून वाढीव वीज बिले देण्यात आली. यामुळे जनता अक्षरश: मेटीकुटीला आली आहे. ही विज बिले माफ करावीत या मागणीसाठी गेल्या जून महिन्यापासून जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहे.
सरकार वेळोवेळी सांगत आहे की, आम्ही जनतेला दिलासा देणार आहोत. मात्र, अधिवेशन संपले तरीही कोणताही निर्णय झालेला नाही. अधिवेशन संपताच वीज कनेक्शन कापण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
सरकार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ करत आहे. म्हणून येत्या 19 मार्च रोजी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको करून आम्ही सरकारच्या या धोरणाविरोधात संघर्ष करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.