येथील साईबाबा संस्थानच्या रामनवमी उत्सवाला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. संस्थानच्या गेट क्रमांक १ मधून काही साईभक्त आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अटकाव केल्याने आधी संस्थानचे सुरक्षारक्षक व भाविकांमध्ये शाब्दीत वादावादी झाली.
नंतर वादीवादीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. गेल्या तीन दिवसापासून शिर्डीत अत्यंत उत्साही वातावरणात रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. काल उत्सवाचा शेवटचा दिवस होता. दुपारी बारा वाजता साईमंदिरात काल्याची दहीहंडी फोडल्यानंतर उत्सवाची सांगता झाली.
उत्सव काळात महाराष्ट्रासह देशभरातून २०० पेक्षा जास्त पालख्या दाखल झाल्या होत्या. या पालख्याबरेबर आलेल्या हजारो साईभक्तांचे शिर्डी ग्रामस्थ व संस्थानने स्वागत करत त्यांना उचित सुविधाही दिल्या होत्या.
काल दुपारी दोन बाजता पालखीबरोबर मुंबईतून आलेले काही तरूण गेट क्रमांक एक वर आले, त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना मंदिर परिसरात जावू देण्याची मागणी केली. परंतु, हे गेट एक्झीट गेट असल्याने येथून प्रवेश करता येणार नाही,
असे सुरक्षारक्षकांनी त्यांना सांगितले.तरीही संबधित तरूणांनी सुरक्षारक्षकांबरोबर आत जावू देण्यासाठी वाद घातला. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. साईभक्त व सुरक्षारक्षक यांच्यांत लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाली.
काही साईभक्तांनी व इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत ही हाणामारी सोडवली. संस्थानचे गेट क्रमांक १ नगर-मनमाड महामार्गलगत असल्याचे घटना घडताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. ज्या साईंनी संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला,
त्या साईंच्या दरबारात अशी हाणामारी होणे चुकीच आहे. साईभक्त व संस्थानचे सुरक्षा कर्मचारी दोघांनीही सबुरी दाखविणे गरजेचे आहे, अशी चर्चा उपस्थित साईभक्तांत सुरू होती. सुरक्षा कर्मचारी व साईभक्त यांच्यात वाद व हाणामारीच्या घटना या आधीही अनेकवेळा घडल्या आहेत. याप्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.