अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज अटक करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी अटकेनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना जे करायचे आहे, ते करू दे, मला जे करायचे आहे ते मी करेन, असे उत्तर दिले. यावेळी अधिक बोलताना नारायण राणेंनी अटक झाली तेव्हा नक्की काय घडले याबद्दलही भाष्य केले आहे.
मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत असल्याचे मला सांगितले.
यावेळी मी त्यांना नोटीस दाखवा असे म्हटले. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन येथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणल्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत.
त्यांचा हेतू मला चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेले जात असल्याचे राणे म्हणाले.
दरम्यान, नारायण राणे आता पुढे काय पाऊल उचलणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वक्तव्य राणेंच्या चांगलंच अंगाशी आल्याचं दिसत आहे. राणेंना जेवता जेवता अटक करण्यात आली.