अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- वडीलांना वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून पुणेवाडी फाटा परीसरात पिंपरीजलसेन येथील एका तरूणाचे अपहरण करून त्यास ४० हजारांची खंडणी मागण्यात आली.
खंडणीची १० हजारांवर तडजोड होउनही अपह्रत तरूणास वडझिरे येथे बेदम मारहाण करून सोडण्यात आले. मंगळवारी सायंकाळी हे अपहरण नाट्य घडले.
वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून तरूणाचे अपहरण करण्यात येउन त्यास ४० हजारांची खंडणी मागण्यात येत होती.
तडजोड करून १० हजार रूपयांवर सौदा नक्की झाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाले. त्यामुळे अपह्रत तरूणास बेदम मारहाण करण्यात येउन त्यास वडझिरे येथील बाजार तळावर जखमी अवस्थेत सोडण्यात आले.
पारनेर पोलिसांना त्याबाबत माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी तरूणास ताब्यात घेतले. नाकाबंदी करून अपहरण करणाऱ्या दोघा तरूणांचा शोध घेण्यात आला.
अपहरण करणारा तरूण पुणेवाडी येथील असून तो पुणेवाडी परीसरातील गणेशखिंड येथे असल्याची माहीती समजल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा लावण्याचा प्रयत्न केला. परंतू तो त्या सापळयातून सटकला.
पुढे सोबेलवाडी रस्त्याने त्याच्याजवळील इनोव्हा कार तो सुसाट वेगाने घेउन गेला. परंतू सोबलेवाडी फाटा येथेही पोलिस असल्याने अलिकडेच त्याने वाहन थांबविले. तेथेच वाहन सोडून वाहनातील दोघेही अंधाराचा फायदा घेउन पसार झाले.