सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांची खंडणी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका भामट्याने अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देत तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याची घटना अंधेरी येथे उघडकीस आली आहे.

या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. आंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी अंधेरी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत राहते.

फेब्रुवारी महिन्यात या मुलीची ओळख आरोपी ईशान पटेल (२२) या भामट्याशी झाली. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. ईशानवर विश्वास ठेवून अल्पवयीन मुलीने त्याला अनेक खासगी फोटो दिले. कुटुंबातील सर्व माहिती सांगितली. मात्र ईशानच्या मनात काही वेगळेच सुरू होते.

ईशानने याच संधीचा फायदा घेऊन मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. मुलीला सोशल मीडियावर बदनामी करण्याची आणि तिच्या आई- वडिलांना बघून घेण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे मुलगी खूप घाबरली होती.

बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. आरोपी तरुणाने तक्रारदार मुलीला ब्लॅकमेल करत तिच्याकडून फेब्रुवारी २०२१ ते जून २०२१ दरम्यान १० हजारांची रोख रक्कम, घरातील मौल्यवान दागिने टप्प्याटप्प्याने काढून घेत तब्बल अडीच लाखांना लुटले. मात्र दिवसेंदिवस ईशानच्या मागण्या वाढतच असल्याने नैराश्येतून मुलीने अखेर पोलिसांची मदत घेतली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24