अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- शहरातील धर्माधिकारी मळा येथे उभारण्यात येत असलेल्या फाईव्ह जी मोबाईल टॉवरचे काम त्वरीत बंद करण्यासाठी संतप्त नागरिकांनी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने नगर-मनमाड रस्त्यावर प्रेमदान चौकात रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलकांना पोलीसांनी अटक केली. या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, डॉ. अजित बोरा, यशवंत शिंदे, विठ्ठल सुरम, गंगाधर नजन, संध्या पवार, शिल्पा कुलथे, ललीता गवळी, रिंकू दांगट, वसुधा शिंदे, माधवी दांगट, लता बोरा आदिंसह धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
एप्रिलमध्ये टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध दर्शविला होता. महापालिका प्रशासनाने सदर काम तात्पुरत्या स्वरुपात बंद पाडले.
मात्र संबंधित जागा मालकाने महापालिकेतील अधिकार्यांशी आर्थिक तडजोड करुन सदरचे काम सुरु केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर टॉवरचे काम सुरु असून अंतिम टप्प्यात आले आहे.
फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरला विरोध आहे. अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, मोबाईल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भाडे व आगाऊ रक्कम मिळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता जागा मालक टॉवर उभारत आहे.
फाईव्ह जी मोबाईल टॉवरमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे दुष्परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिध्द झाले आहे. महापालिकेतील अधिकार्यांनी आर्थिक हितसाधून लोकवस्तीमध्ये टॉवर उभारण्यास परवानगी दिली आहे.
हे टॉवर उभे राहत असले तरी नागरिकांचा याला कायमचा विरोध असून, हा टॉवर मोडित काढण्याचा इशारा त्यांनी दिला. अशोक सब्बन यांनी शहरात मोठ्या संख्येने नियमबाह्य पध्दतीने टॉवर उभारले जात असल्याचे स्पष्ट केले.
जागतिक आरोग्य संघटना व उच्च न्यायालयांच्या निर्णयाचा विचार न करता फक्त पैश्यासाठी हे टॉवर उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. जीवविविधता या टॉवरमुळे धोक्यात आली आहे. महापालिकेने परवानगी देताना स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा विचार करण्याची गरज होती. या टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.