22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्याला जायचे आहे का? तर अयोध्यातील ‘या’ स्थळांना आवर्जून भेट द्या! वाचा माहिती

Published by
Ajay Patil

बहुचर्चित असलेल्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला असून त्याकरिता अयोध्या मध्ये मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. जणू काही अयोध्या नगरी नववधू सारखी सजवण्यात येत आहे. 22 जानेवारी 2024 नंतर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी अयोध्या नगरी पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. सध्या त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली जात आहे.

जर आपण अयोध्याचा विचार केला तर अयोध्या ही श्री राम यांच्या जीवनाशी निगडित असून श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा या ठिकाणी सामावलेल्या आहेत. या अनुषंगाने जर तुम्हाला देखील 22 जानेवारीला अयोध्या येथे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे असेल तर तुम्ही त्या व्यतिरिक्त अयोध्येतील काही महत्त्वाच्या स्थानांना नक्कीच भेट देणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण अयोध्येतील ही स्थळे कोणती आहेत याबद्दलची माहिती घेऊ.

 अयोध्येतील ही स्थळे आवर्जून पहावी

1- हनुमान गढी मंदिर हनुमान गढी मंदिर हे अयोध्येतील एक मानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते व या मंदिरात दर्शनाकरिता तुम्हाला तब्बल 76 पायऱ्या चढून जाणे गरजेचे असते. या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती सोबतच हनुमान आणि माता अंजनीची मूर्ती विराजमान आहे. या ठिकाणी जे भाविक दर्शनाला येतात ते रामाचे दर्शन घेण्याअगोदर रामभक्त हनुमानाचे दर्शन घेतात.

2- कनक भवन कनक भवनाचा अर्थ म्हणजे सोन्याचा घर असा होतो. सीता मातेच्या स्वयंवरानंतर राणी कैकेयीने सीतेला हा महाल भेट म्हणून दिला होता अशी एक आख्यायिका आहे. प्रभू श्रीराम माता सीतेसह याठिकाणी काही कालावधी करता राहिले होते असे देखील परंपरेमध्ये मानले जाते. कनक भवन येथे राम आणि सीता यांच्या एकत्रित मूर्ती असून दोन्ही मूर्ती सुवर्ण मुकुटधारी आहेत.

3- दशरथ पॅलेस रामलल्लाच्या मंदिरापर्यंत जायचे असेल तर भक्ती पथ आणि जन्मभूमी पथ हे दोन मुख्य रस्ते सध्या पूर्णत्वाकडे असूनही दोन्ही रस्ते ज्या ठिकाणी संपतात तिथे दशरथ पॅलेस आहे. राम, लक्ष्मण तसेच भरत, शत्रुघ्न या भावंडाचे बालपण याच राजवाड्यात गेले असे मानले जाते.

4- नागेश्वरनाथ मंदिर प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यांनी सर्व नदीच्या काठी हे मंदिर बांधले होते असे म्हटले जाते. जेव्हा कुश हे शरयू मध्ये आंघोळ करत होते तेव्हा त्याच्या हातातील कडे हरवले व ते हरवलेले कडे एका नागकन्याला सापडले आणि कुश तिच्या प्रेमामध्ये पडले. ही नागकन्या शिवभक्त होती व त्यामुळे तिच्यासाठी खास कुश यांनी हे मंदिर बांधले. सध्याचे हे मंदिर राजा विक्रमादित्यच्या काळापासून म्हणजे साधारणपणे पंधराशे वर्षांपूर्वीचे आहे.

5- त्रेता ठाकूर मंदिर या मंदिराला काळाराम मंदिर म्हणून देखील ओळखले जाते व प्रभू श्रीरामचंद्र यांनी याच ठिकाणी अश्वमेध यज्ञ  केला होता असं म्हटले होते. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील राजाने हे मंदिर बांधले होते व पुढे इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी त्याचे नूतनीकरण केले.

6- मणी पर्वत लंकेमध्ये राम आणि रावण यांच्यात युद्ध सुरू असताना लक्ष्मण जेव्हा जायबंदी झाले होते तेव्हा त्यांचा जीव वाचवण्याकरिता हनुमंत हे संजीवनी पर्वत घेऊन लंकेला जात असताना पर्वताचा एक भाग तुटून आयोध्यामध्ये पडला होता व तेथे 65 फूट उंच टेकडी तयार झाली व या टेकडीलाच मणी पर्वत म्हणून ओळखले जाते.

7- बिर्ला मंदिर बिर्ला मंदिर अयोध्या- फैजाबाद मार्गावर असून रामलल्लाच्या मंदिराचा मुख्य रस्ता देखील या मंदिरासमोरच जातो. बिर्ला मंदिरामध्ये राम आणि सीता व लक्ष्मणाच्या मूर्ती असून या मंदिराला जवळच 55 खोल्यांची बिर्ला धर्मशाळा देखील आहे.

8- गुप्तार घाट शरयू नदीच्या तीरावर असलेल्या गुप्तार घाटावर भगवान श्रीराम यांनी जलसमाधी घेतल्याचे मानले जाते व राजा दर्शन सिंह यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला हा घाट बांधला व यावर अनेक मंदिर आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil