अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महसूल, पोलिस, पालिका, आरोग्य व पंचायत समिती अशा सर्व यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत झाल्या आहेत.
नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. लग्नसोहळे, दशक्रियासाठी शासनाने निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपस्थिती तपासणीदरम्यान आढळली, तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांनी दिली.
निरीक्षक डेरे म्हणाले, रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्व व्यवसाय, बाजारपेठ,हॉटेल बंद राहतील. रात्री दहा वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आहे. यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, आंदोलने, संस्कृतित कार्यक्रम,
धार्मिक मेळावे कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी राहील. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी वावरणे मास्कचा वापर टाळणे, रस्त्यावर गर्दी करणे अशा वर्तनावर नजर ठेवण्यासाठी शहरात विविध पथके तैनात केले जाऊन विविध चौकासह जिल्हा हद्दीवर तपासणी नाके सुरू केले जातील.
अत्यावश्यक कामाशिवाय कोणी प्रवास करू नये व बाहेरगावच्या पाहुण्यांना येण्याचा आग्रह करू नये. प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांच्या दुकानापुढे सुरक्षित आंतरावर ग्राहक उभा राहील. विक्रेता व ग्राहक दोघांनाही मास्क अनिवार्य असून
या दुकानात विनामास्क ग्राहक दिसेल त्या विक्रेत्याविरुद्ध कारवाई होईल. रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई अटळ आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने संपूर्ण प्रशासन तालुक्यात कार्यरत झाले आहेत.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण,तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, आगार प्रमुख महेश कासार,
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक कराळे आदींच्या उपस्थितीत व्यापारी संघटना प्रतिनिधी, स्वयंसेवक संस्था,
वैद्यकीय संघटना औषध विक्रेते संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी अभय गांधी, योगेश रासने,दिलीप गटागट,भैय्या इजारे, डॉ. दीपक देशमुख, अशोक मंत्री,रवींद्र वायकर आदी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.