अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- सध्या सगळीकडे कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे आबालवृद्ध चिंतेत आहेत, तर लस मिळेल की नाही याची चिंता अनेकांना आहे.
मात्र, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वाडीवस्तीवरील महिलांना चिंता आहे ती पाण्याची! त्यांना ना कोरोनाची चिंता आहे, ना लसची. हंडाभर पाणी मिळाले की आपली चिंता मिटली यातच ते धन्यता मानत आहेत.
संगमनेर तालुक्याच्या वनकुटे गावापासून उंच डोंगरावर पाबळ व नंदाळे पठार या आदिवासी वाड्यांमध्ये मोठी पाणी टंचाई आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरुन खाली यावे लागत आहे.
पिण्यासाठी पाणी नसल्याने येथील महिला, पुरुष, लहान मुले हंडे घेऊन पाणी आण्यासाठी डोंगर उतरुन खाली येतात.
पुन्हा विहिरीतून पाणी शेंदून हंडा भरायचा आणि डोक्यावर दोन ते तीन हंडे घेवून डोंगर चढायचा, असा त्यांचा दैनंदिन उपक्रम आहे. वर्षांनुवर्षांपासून अशा पद्धतीने आदिवासी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
सध्या वनकुटे गावठाण, नंदाळे पठार, पाबळ पठार, गांगड वस्ती या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
त्यासंबंधी ग्रामसेवकांनी प्रस्तावही तयार करून पाठविले आहेत. मात्र, महसूलसह सर्व यंत्रणा सध्या करोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने पाणी टंचाई आणि टँकरसंबंधीच्या बैठका अद्याप झालेल्या नाहीत.