‘त्या’ शेतकऱ्यांसाठी साकारतेय ‘शेतकरी तणावमुक्ती केंद्र’!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  उभ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे कायम आर्थिक विवंचनेत सापडतो. मात्र आपल्या काळ्या आईची कूस भरण्यासाठी तो सतत धडपडत असतो.

अनेकदा या धडपडीत नैराश्याने मरणाला देखील कवटाळतो. त्याच जगाच्या पोशिंदयाला नैराश्यातून बाहेर काढून आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावे यासाठी.

खास शेतकऱ्यांसाठी राज्यातील पहिले छत्रपती संभाजी महाराज शेतकरी तणावमुक्ती केंद्र आणि आधार केंद्र उभा केले जात आहे.

मराठवाडी या ठिकाणी माळरानावर एक एकर क्षेत्रात या शेतकरी तणावमुक्ती केंद्राचे सर्व सुविधायुक्त बांधकाम होणार आहे.

या ठिकाणी राज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रबोधन, विविध पुस्तकांचे वाचन, परमार्थिक क्षेत्राचे धडे यासह त्यांचे समाज प्रबोधन करण्याचे काम प्राधान्याने केले जाणार असून,

येथे येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व निवार्‍याची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून कितीही संकट आली तरी शेतकऱ्याने आत्महत्यचा मार्ग कदापि अवलंबू नये त्याने त्याचे आयुष्य काही क्षणात क्षणभंगुर करू नये हा त्या मागचा उद्देश आहे.

एका शेतकऱ्याच्या आत्महत्यामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता हे शेतकरी तणावमुक्त केंद्र उभे करण्याची संकल्पना पाथर्डी तालुक्यातील घोरपडे

यांच्या मनात आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या केंद्राच्या बांधकामास सुरूवात केली. शेतकऱ्याचाच मुलगा शेतकऱ्यांच्या व्यथा जाणू शकतो या भावनेतून हे केंद्र उभारले जाणार असून सुरुवातीला स्वखर्चातून हे केंद्र सुरू केले जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office