अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- शासनाकडून स्वस्त धान्य दुकानासाठी आलेला गहू, तांदूळ, साखर, चना डाळ, मका, चना आदी मालाचे लाभार्थ्यांना वाटप न करता परस्पर खुल्या बाजारात विक्री करून सुमारे ३ लाख ५६ हजार ४५४ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत स्वस्त धान्य दुकान चालविण्यात येते. या दुकानाची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दि.२६ मार्च २०२१ रोजी तपासणी केली असता या दुकानात कमी-अधिक प्रमाणात तफावत आढळून आली होती.
त्यानंतर दुकान परवाना असलेल्या सेवा सोसायटीच्या चेअरमन यांना नोटीस देवून खुलासा मागवला होता. त्यानंतर पुन्हा मंगळवारी (दि.२० जुलै) पुरवठा निरीक्षक यांनी स्वस्त धान्य दुकानातील साठा व रजिस्टरची तपासणी केली असता दुकान चालकाने ३ लाख ५६ हजार ४५४ रूपये किंमतीचे गहू, तांदूळ,
साखर, चना डाळ, मका आदी धान्याचे गरजू लाभार्थ्यांना वाटप न करता त्याची साठवणूक करून खुल्या बाजारात परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास आले.
या स्वस्त धान्य दुकानदाराने शासनाची फसवणूक केल्याने दुकानदार भाऊसाहेब भिमराज शिंदे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.