अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway : अहमदनगर रेल्वे स्थानकाबरोबर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांचादेखील पुनर्विकास झाला पाहिजे, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. याबाबत आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी – नगर- पाथर्डी मतदारसंघातील राहुरी व वांबोरी ही रेल्वे स्थानके शनिशिंगणापूर देवस्थानच्या जवळ असणारी सर्वात महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.

गेल्या तीन वर्षात ही रेल्वे स्थानके शेवटच्या घटका मोजत आहेत. सुमारे ७ ते ८ गाड्यांची रोज ये-जा असणाऱ्या स्थानकांमध्ये आता फक्त एक गाडी सुरू ठेवली आहे. देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शुभारंभ होत आहे.

यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश झाला असून त्यात अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांचादेखील पुनर्विकास झाला पाहिजे.

कोविडच्या काळात गोर गरिबांचा आधार असणारी पॅसेंजर सेवा बंद केली होती, ती आता कायमचीच बंद आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चून विकसित रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आपण करणार असू तर या योजनेतून आपल्याला काय साध्य होत आहे?

आपल्या मतदारसंघातील नागरिकांना मोठ्या मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी रेल्वे हा प्रमुख पर्याय यापूर्वीच्या काळात उपलब्ध होता. मनमाड, भुसावळ पॅसेंजरसह पटना एक्सप्रेसलादेखील येथे थांबा होता. त्याचप्रमाणे दौंड, पुणे यांसह मुंबई साईनगर त्याचप्रमाणे दौंड, पुणे यांसह मुंबई साईनगर एक्सप्रेस सारख्या एक्सप्रेस देखील कोरोना आधीच्या काळात राहुरी स्टेशनवरून धावत होत्या.

परंतु कोविडच्या नावाखाली अशी छोटी स्थानके बंद पाडण्याचाच घाट घातला गेला आहे. पुनर्विकासासाठी जिल्ह्यातील इतर स्थानकांचा विचार केला गेला पाहिजे होता. या पुढील काळात तरी किमान काही पॅसेंजर चालू करून या रेल्वे स्थानकांना पुनरुज्जीवित करण्याचे काम हे व्हायला हवे.

या रेल्वेसाठी आमच्या भूमिपुत्रांच्या जमीनी गेल्या आहेत, प्रवासी संघटनेमार्फत कित्येक वर्ष रेल्वेला सहकार्य केले जात आहे, तरी देखील रेल्वे मात्र आपल्या सर्वसामान्य प्रवासांची हाक ऐकायला तयार नाही, अशी टीका आमदार तनपुरे यांनी केली आहे.