अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीकाठी वसलेल्या अंमळनेर ग्रामस्थांनी वाळू लिलावास विरोध केला आहे. गुरुवारी (दि. ०५) अंमळनेर ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच अरुणाताई भारत जाधव य झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते वाळू लिलाव करण्यास नकार दिला.
यावेळी महसुल विभागाकडून नोडल ऑफिसर म्हणून ताहाराबादचे मंडलाधिकारी एस. एस. हुडे, प्रभारी तलाठी अशोक चितळकर, ग्रामसेवक अभिजित पिंपळे यांनी कामकाज पाहिले. रविवारी (दि. ०१) आंबी, अंमळनेर, केसापूर या गावांमध्ये वाळू लिलावसाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी आंबी व केसापूरकरांनी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन वाळू लिलावास विरोध दर्शविला होता.
मात्र कोरम अभावी अंमळनेरची ग्रामसभा तहकूब केली गेली होती. त्याचवेळी पुढील वाळू लिलाव विषयक ग्रामसभा गुरुवारी (दि. ०५) रोजी घेण्याचे नियोजित केले होते. माजी सरपंच रोहण जाधव यांनी २०१४ साली झालेल्या वाळू लिलावातुन ग्रामपंचायतीस मिळणारी रक्कम अद्यापपावेतो मिळाली नाही. सदर रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली.
मच्छीन्द्र जाधव यांनी वाळू लिलाव झाल्यास गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे मत व्यक्त केले. तर अच्युत जाधव यांनी निळवंडे कालव्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने असून भविष्यात नदी पात्रात पाण्याची आवक कमी असणार आहे.
त्यामुळे वाळू नसेल तर पाणी पातळी स्थिर राहणार नाही असे प्रतिपादन केले. सभेसाठी भारत जाधव, कोंडीराम साळुंके, दादासाहेब साळुंके, बाळासाहेब जाधव, राहुल सालबंदे, म्हसु साळुंके, अर्जुन जाधव, सुनिल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.