अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
होण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देऊन देखील कारवाई होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने जिल्हा प्रशासनास स्मरणपत्र देण्यात आले.
तर या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिव व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला. एप्रिल महिन्यात कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती.
अशा परिस्थितीमध्ये भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. किशोर मस्के व डॉ. कौशल्या म्हस्के यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करुन रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे काम केले.
हॉस्पिटल मधील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन न देता इंजेक्शनची जास्त किमतीत विक्री केल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. सदर प्रकरणी हॉस्पिटलवर पोलीस प्रशासनाने छापा टाकून गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र अद्यापि हे दांपत्य फरार आहे.
सदर मेडीकलची सर्व जबाबदारी हॉस्पिटलचे मालक असलेले डॉक्टरवर आहे. सदर मेडिकल मधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असतानाचे चित्रीकरण झालेले आहे. सदर डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
होण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे निवेदन व व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे देण्यात आले होते. तरी देखील संबंधीतांवर कारवाई होत नसल्याने आरपीआयच्या वतीने जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र देऊन न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला.